" भगीरथ भालके यांनी परिचारक गटा सोबत न जाणेच योग्य" .......
पंढरपूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्यातील अडीच तीन वर्षानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद ,ग्रामपंचायत, महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत. पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायत आणि नगरपालिका या निवडणुकांमधून विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी इच्छुक उमेदवार हे आपापल्या परीने आपल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न आता सुरू झाल्याचा दिसून येत आहे.
मध्यंतरी भालके गट तसेच परिचारक गट मिळून मंगळवेढा साखर कारखान्याची निवडणूकीत युती करुन यश मिळवले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभेमध्ये काँग्रेस आय च्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली एक लाखाच्या पुढे मतदान मिळवले .परंतु काही ठिकाणी भालके नियोजनामध्ये कमी पडल्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. भगीरथ भालके हे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये चमत्कार दाखवण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. भालके गटाला मानणारा अजूनही मतदार या पंढरपूर शहरांमध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांच्या पत्नी डॉ. प्रणिती ताई भालके यांनी आपली उमेदवारी जाहीर करावी अशी इच्छा व मागणी भालके गटातील कार्यकर्त्याकडून होत असल्याचे दिसत आहे. भगीरथ भालके यांनी अद्याप तरी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या पंढरपूर शहरांमध्ये परिचारक गटाच्या विरोधातील सर्व विरोधक एकत्र येत असल्याचे दिसत आहे. या विरोधकांची बैठका, चर्चा होत आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे काँग्रेस आय अध्यक्ष माजी नगरसेवक आदित्य फतेपुरकर , शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संभाजी राजे शिंदे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले आणि विठ्ठल परिवाराचे असंख्य कार्यकर्ते व नेतेमंडळी हे बैठकीला उपस्थित होते.
परिचारक गटाची गेल्या कित्येक वर्षापासून पंढरपूर नगरपालिका वर असलेली त्यांची सत्ता ही उलटवून टाकण्याच्या उद्देशाने हे विरोधी गट एकत्र झाले आहेत. पंढरपूर शहराची रखडलेली विकास कामे ,रस्त्यांची दुर्दशा, मूलभूत सुविधांचा अभाव, घाणीचे साम्राज्य, धुळीचे साम्राज्य त्याचबरोबर पंढरपूर शहरांमध्ये होऊ पाहणारा कॅरीडोर याला होणारा विरोध या सर्व गोष्टी परिचारक गटाच्या विरोधात जाणाऱ्या आहेत.
मंदिर परिसरामध्ये होऊ पाहणारा कॉरिडॉर हा त्या परिसरातील स्थानिक रहिवासी, दुकानदार व्यापारी यांचा प्रचंड विरोध दिसून येत आहे. परिचारक यांनी या दुकानदाराची व रहिवाशांची बाजू व्यवस्थितपणे सरकार दरबारी न मांडल्याचे खापर परिचारक गटावर फुटत आहे. या मंदिर परिसरातील मतदार परिचारक गटाच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता जास्त बळावली आहे. हा मंदिर परिसर परिचारक गटाला मताधिक्य देणारा म्हणून ओळखला जातो. कॅरिडॉर मुळे या भागातील लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याचे भावना या लोकांमध्ये झाल्याने परिचारक गटाला हा विरोध होणारच आहे.
भगीरथ भालके यांनी पंढरपूर शहरातील मतदारांच्या संपर्कात राहून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याची गरज सध्या दिसून येत आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर माढ्याचे आमदार अभिजीत आबा पाटील व भगीरथ भालके यांच्यामधील राजकीय वादामुळे विठ्ठल परिवार गट हा वेगळा पडतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अभिजीत आबा पाटील यांना विरोध दर्शवायचा म्हणून जर पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये भगीरथ भालके आपली वेगळी भूमिका घेणार असतील तर ते नुकसानीचे ठरण्याची जास्त शक्यता आहे. उद्याच्या विधानसभेमध्ये निवडून यायचे असेल तर परिचारक विरोधी गटातील सर्वपक्षीय कार्यकर्ते नेत्यांना एकत्र केल्याशिवाय भालके यांना पर्याय राहणार नाही. परिचारक गट उद्याच्या विधानसभेमध्ये सहकार्य करेल की नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे परिचारक गटाच्या विरोधातील गटामध्ये सामील होऊन भगीरथ भालके यांनी विरोधी सर्वपक्षीय गट एकत्र करून पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लढवावी अशी भावना परिचारक विरोधी गटातील भालके कार्यकर्त्यांची आहे.
भालके आणि परिचारक यांचे जरी मनोमिलन झाले तरी पंढरपूर शहरातील भालके गटाचे कार्यकर्त्यांचे आणि परिचारक गटातील कार्यकर्ते यांचे मनोमिलन होण्याची शक्यता खूपच कमी दिसून येते. भालके यांनी भविष्यातील विधानसभेसाठी पुन्हा एकदा जय्यत तयारी करायची असेल तर परिचारक विरोधातील सर्वपक्षीय नेते मंडळी व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन ही पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लढविल्यास उद्याची विधानसभा ते सहज काबीज करू शकतात. परिचारक यांच्या गटाशी मनोमिलन केल्यास परिचारक भालके यांना विधानसभेमध्ये मदत करतील याची शक्यता खूपच कमी दिसून येते अशी चर्चा संपूर्ण पंढरपूर शहर परिसरामध्ये आज ऐकवास मिळत आहे.
भगीरथ भालके यांनी परिचारक गटा सोबत न जाणे योग्य अशी भावना पंढरपूर शहरातील कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेमधून व्यक्त होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा