"सोलापूर जिल्ह्यातील पुढाऱ्यानो शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीला कधी धाऊन येणार".....
पंढरपूर ( प्रतिनिधी ) कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे .दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा आणि सोलापूर जिल्हा या भागामधून देखील प्रचंड पावसाने थैमान घालून सर्वसामान्यांचे तसेच शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करून शेतकऱ्यांचे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. या शेतामधील व पीक या पावसाने मातीमोल केले. शेतामधील माती वाहून गेली, जनावरे वाहून गेली ,शेळी बकरे, शेतामधील धान्य ,पीके,घरे वस्त्या हे सर्व काही वाहून गेले .अगोदरच कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेला हा शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा एकदा कर्जाच्या फेऱ्यांमध्ये अडकलेला आहे. अशा या अन्नदात्याला या अस्मानी संकटातून वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना किती मदत करणार आहे ॽनुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2000 ते अडीच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केले आहे. ही मदत अतिशय तुटपुंजी असून शेतकऱ्याची गरज या निधीमधून भागणार नाही. महाराष्ट्र सरकार कुंभमेळ्यासाठी 24 हजार कोटी रुपये चा निधी राखीव म्हणून ठेवू शकतात. परंतु संपूर्ण जगाचा अन्नदाता शेतकरी संकटात असताना त्याला नाम मात्र मदत देऊ पाहत आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे की उद्योगपतींचे आहे? हे कळेनासे झाले आहे.
सोलापूर जिल्हा देखील या आसमानी थैमानाला बळी पडलेला आहे. सोलापूर जिल्ह्यामधील सांगोला, पंढरपूर ,मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, करमाळा ,बार्शी हे तालुके म्हणजे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जातात. या सर्व तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. भीमा नदीच्या तीरावरील असंख्य गावे तसेच सीना नदीच्या तीरावरील असलेले असंख्य गावे हे पाण्याने वेढले गेले. या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी मधील उभे असलेले पीक पाण्याखाली गेले कित्येकांची घरे बुडली जनावरे मेली आहेत .आता या आवर्षणग्रस्त भागामध्ये राजकीय पुढारी नेतेमंडळी आमदार खासदार आजी-माजी आमदार हे फिरू लागले आहेत. महाराष्ट्र शासनाकडून मदत मिळवून देऊ शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांचे पंचनामा करू असे आश्वासन देऊन आपण या शेतकऱ्यांना भेट दिली असे माध्यमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सांगू लागलेले आहेत. परंतु या राजकीय पुढाऱ्यांनी व राजकीय नेत्यांनी आजी-माजी आमदार खासदार यांनी स्वतःच्या खिशामधून एक ही रुपया शेतकरी बांधवांच्यासाठी मदत म्हणून दिलेला नाही. शेकडो कोटीची संपत्ती जमवलेली ही राजकीय नेते मंडळी या शेतकऱ्यांच्या जीवावर ,सर्वसामान्यांच्या जीवावर आमदारकी खासदारकी भूषवतात कारखान्याचे चेअरमन होतात. अशा या राजकीय पुढार्यांनी खुल्या मनाने शेतकऱ्यांना मदत करण्याची हीच ती वेळ आलेली आहे. अशा या संकटकाळी शेतकऱ्यांना मदत केली तरच उद्याच्या येणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकी मधून या पुढार्यांना ते मतदान करतील .अन्यथा त्यांना कायमचा घरचा रस्ता दाखवतील अशी मनस्थिती आज शेतकऱ्यांच्या मधून सर्वत्र दिसून येत आहे. पाहूया हे राजकीय पुढारी शेतकरी बांधवांना काय मदत करतात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा